About

Searching...
Thursday, 5 July 2012

July 05, 2012
डॉ. बाबासाहेब आंबेडकर - भाग : १६ (महाड सत्याग्रह, मनुस्मृतीचे दहन )
समाज समता संघ:
सप्टे १९२७ ला समाज समता संघाची स्थापणा झाली. हिंदु धर्माती अस्पृश्य वर्गाला वेदमंत्रांचा अधिकार बहाल करण्यासाठी या संघानी काम चालु केले. महारांचे वेदीक मंत्रानी लग्न लावण्याचे काम झपाट्याने सुरु झाले. या संघाची लोकं वेद मंत्रानी महारांच्या विधी उरकायचा सपाटा लावला. जिकडे तिकडे महारांमधे उत्साहाचे वितावरण दिसु लागले. या संघाचे सभासद आळीपाळीने एक दुस-या अस्पृश्य व स्पृश्य सभासदांकडे सहभोजन घडवुन आणत. महाराष्ट्रातिल प्रसिद्ध नाटककार व कादंबरीकार श्री. भा. वि. वरेकर यानी या कामासाठी स्वत:ला झोकुन दिले अन समतेचा धार्मिक व वेदिक मंत्र-पुजा आघाडीचा धुरा आपल्या खांद्यावर घेऊन अस्पृश्यनिवारणाच्या कार्यात उडी घेतली.
तिकडे अमरावतीला गवई यानी याच वर्षी म्हणजे १९२७ च्या ऑगष्ट महिन्यापासुन अंबादेवी मंदिर प्रवेशाचा सत्याग्रह चालविला होता. काही झालेतरी मंदिरात प्रवेश मिळालाच पाहिजे. त्या आधी बाबासाहेबानी महाड चवदार तळ्याचा सत्याग्रह केल्यापासुन खेड्या पाड्यातिल लोकं पेटुन उठलित. अस्पृश्य अधिकाराची मागणी करण्यासाठी तर संवर्ण वर्चस्व कायम ठेवण्यासाठी. एकंदरीत समाजातिल दोन्ही गट शोषित व शोषक हे पेटुन उटले. पण या वेळेस अस्पृश्य आपला अधिकार मिळवुनच दम घेणार होते. इंग्रजांच्या मेहरबानीमुळे सनातन्यांच्या अमानुष छळाच्या विरोधात किमान आवाज उठविण्याचीतरी संधी मिळाली होती. इंग्रज नसते तर आजही परिस्थीती तशीच असती. मंदिरांच्या प्रवेशाची विश्वस्तांकडे विनंती करणारे बरेच पत्र व निवेदन देऊन झाले होते. आता सत्याग्रहा द्वारे मंदिरात प्रवेश केल्यावरच दम घेणार असेही कळविण्यात आले. अमरावतिला अस्पृश्यांची परिषद भरविण्यात आली. बाबासाहेब या परिषदेचे अध्यक्ष होते. याच दरम्याना बाबासाहेबांचे जेष्ठ बंधुंचे निधन होते. परिषदेत काही महत्वाचे ठराव पास करण्यात येतात व महाडचा सत्याग्रह पुढे उभा ठाकल्या असल्याने हि सत्याग्रह तिन महिन्यासाठी स्थगित करण्याचा ठराव पास करण्यात येते.
तिकडे महाड्मधे सत्याग्रहाची जोरदार तयारी चालली होती. सनातन्यांचे धाबे दणाणले होते. अस्पृश्य समाज आजवर आपल्या अधिकारांचा बळी देऊन अंगातिल सगळ्या कलागुणांना धर्माच्या नावाने विसर्जीत करुन जगत होता. पण आता मात्र तो धर्माजे मनुवाद विसर्जित करन्याच्या मार्गाने पाऊल टाकु लागला होता. महाड व आस पासच्या भागात जिकडे तिकडे सत्याग्रहाचे वारे वाहु लागले. सत्याग्रहाची तारिख २५ व २६ डिसेंबर १९२७ जससशी जवळ येत होती तसतसे सनातन्यांची धुसफुस सुरु झाली.
१७ नोव्हे. १९२७ रोजी सनातन्यानी सत्याग्रहाचे तिन तेरा वाजविण्यासाठी वीरेश्वर मंदिरात सभा घेतली. हि बातमी कानावर येताच सुरभा टिपणीस व बापु जोशी या कार्यकर्त्यानी आपले भिम सैनिक घेऊन थेट सभेवर धडक मारली. समोर भिमसैनिकांचा ताफा बघुन सनातन्यांची बोबळी बसली. एकेकाला चांगलाच चोप देत भिम सैनिकानी सनातन्यांची सभा उढळुन लावली. पुण्यातिल हिंदु सभेच्या कार्यकर्त्यानी महाडच्या सनातन्यांची समजुत काढण्यासाठी महाडला येऊन बरेच प्रयत्न केले पण ऐकतिल ते कसले मनुवादी, त्यानी एक नाही ऐकलं अन आपला रेटा तसाच ठेवला.
या सनातन्यानी जिल्ह्याधिका-याला मधिस्ती बनवुन महाड सत्याग्रहावर चर्चा घडवुन आणली. कुठल्याही परिस्थीतीत सत्याग्रह होऊ नये अशी भुमिका घेतली. सत्याग्रहावर जिल्हाधिका-याने बंधी घालावी अशी विनवणी केली. पण जिल्हाधिका-याने तसे करण्यास साफ ईनकार केला.
आता मात्र सनातन्यांचे सगळे मार्ग बंद झाले कुठल्याही परिस्थीतीत हा सत्याग्रह होणे अटळ होते. काही झाले तरी सत्याग्रह होऊ दयायचा नाही. महाराना तळे बाटवु दयायचे नाही असा चंग बांधण्यात आलेला होता. अन सनातन्याना एक युक्ति सुचली.
१२ डिसेंबर १९२७ रोजी १) नरहरी वैद्य २) पांडुरंग धारण ३) नारायण देशपांडे अन यांचे इतर सोबती अशा एकुण ९ जणानी बाबासाहेबांवर दिवाणी न्यायालयात खटला भरला. एक महार जातिचा वकिल आमच्या चवदार तळ्यातिल पाणि बाटविण्यासाठी सत्याग्रह करतो आहे. जेंव्हा की महाड नगरपालिकेने खुद्द हे तळे अस्पृश्यांसाठी बंद केले असता असा दळभद्रिपणा करणा-या आंबेडकरांवर कारवाई करावी अन आमचे धर्माचे रक्शण करावे.
एवढच करुन हे सनातनी थांबले नाही, तर त्यानी महाड येथील दुय्यम न्यायालयात दुसरा दावा केला. कुठल्याही परिस्थीतीत तळ्य़ाला हात लावु देणार नाही असा पवित्रा घेतला होता.
१४ डिसेंबर १९२७ रोजी या दुय्यम न्यायालयाचा निकाल लागला. न्या. वैद्य यानी अस्पृश्यानी न्यायलयाचे दुसरे आज्ञापत्र येईस्तोवर वाट बघावी, असा निर्वाळा दिला. ईथे मात्र आंबेडकरांपुढे खरा न्यायालयिन पेच उभा ठाकला.
आता न्यायालयाच्या निर्णयाची वाट बघावी की ११ व्या दिवशी होणारी सभा घ्यावी असे पेचात पडले. आता सत्याग्रह रद्द करणे अवघड होते. अन न्यायालयात घटला प्रलंबित असताना जर काही कमी जास्त घडले तर ते सरकारची आज्ञा मोडल्यामुळे त्यांच्यावर कायदेशिर कारवाई होण्याची शक्यता होती. अन शेवटी काही झाले तरी सत्याग्रह करायचाच असे जाहीर करुन कार्यकर्त्याना जोमाने कामाला लागण्याची आज्ञा दिली.
आता मात्र तिकडे सनातनी चवताळून उठले, सरकारही आता नविन अडचणीस तोंड देण्यासाठी सज्ज होणार होते. गांधी नावाच्या माणसाने राजकिय हक्कासाठी स्वातंत्र्य नावाची बोगस चळवळ उभी करुन सरकारला वेठीस धरलेच होते. बहुसंख्य हिंदुंच्या बळावर सरकारला घाम फुटेल असे सत्याग्रहस्वरुप सनातनी कारवाया चालु ठेवल्या होत्या. त्यामुळे बिचारी इंग्रज मायबाप सरकार ज्यानी आम्हाला समतेचा विचार मांडण्याची मोकळीक दिली अशा सरकारची जिकडे तिकडे फजिती केली जात होती, अन या सगळ्या कार्यक्रमाचा सुत्रधार होता गांधी.
महाडमधे अवध्या दहा दिवसात परिषद भरणार होती पण कुणीच जागा देईना. अशा वेळी सदा माणुसकीसाठी जागणारा पण आजच्या आधुनिक सनातन्यानी आतंकवादी म्हणुन हिनविल्या जाणा-या मुस्लिम समातिल त्या काळचे एक महान विभुती मो. फत्तेखान यानी परिषदेसाठी आपली जागा देण्यासाठी पुढाकार घेतला. फत्तेखान यानी आपण अस्पृश्य परिषदेसाठी जागा देणार असे जाहिर करताच सनातन्यांच्या चेह-यांवरिल विजयाचे भाव क्षणात ओसरले. जागेच्या प्रश्नावरुन अस्पृश्याना अडचणीत आनण्याचा त्यांचा डाव एका मुस्लिम बांधवानी पद्धतशीरपणे हानुन पाडला.
जागा मिळाली, परिषदेसाठी भव्य मंडप टाकण्याचे काम चालु झाले. पण आता सनातन्यांकडे दुसरे व शेवट्चे हत्यार होते ते उपसले गेले. परिषदेस येणा-या अस्पृश्याना गावातिल कुठल्याच व्यापा-याने वस्तु विकायच्या नाही असा निर्णय घेण्यात आला. पण अनंतराव चित्रेनी हाही डाव हाणुन पाडला. दुस-या गावातुन अन्न धान्य मागविण्यात आले. कुणाचे नुकसान झाले असेल तर त्या व्यापा-यांचेच. आता जागेचा प्रश्नापाठोपाठ अन्नाचाही प्रश्न निकाली काढण्यात आला. बघता बघाता एक हि परिष एका दिवसावर येऊन ठेपली. तिकडे महाडमधे अस्पृश्यानी पाठिवर शिदो-या बांधुन हजारोंच्या संखेनी हजेरी लावली व ईकडे बाबासाहेब मुंबईहुन महाडला निघण्याची तयारी करत होते.
२४ डिसेंबर १९२७ रोजी सकाळी पद्मावती नावाच्या आगबोटीने आपले कार्यकर्ते भाऊराव गायकवाड, राजभोज, शिवतरकर, सहस्त्रबुद्धे व प्रधान बंधु इ. फौजफाटा घेऊन हा अस्पृश्यांचा सेनापती महाडच्या दिशेनी कुच करतो. आज बाबासाहेब अत्यंत महत्वाच्या मोहिमेवर निघाले होते. मोहिम फत्ते करण्यात ब-याच अडचणी होत्या. मधेच न्यायालयाचा पिल्लु निघाल्यामुळे ते अस्वस्थही होते. पण हि वेळ माघार घेण्याची नव्हती. आता गरज पडली तर सरकारच्या विरोधातही दंड थोपटावे लागतील अन तशी तयारी करुनच ते महाडच्या दिशेनी वा-याच्या वेगाने सुटतात. सकाळी ९ वाजता निघालेला हा महाबली सायंकाळी ५.३० च्या दरम्यान हरेश्वरला पोहचतो. येताना प्रत्येक बंदरात या सेनापतीची सेना त्यांचा घोषणानी जयघोष करत होती. प्रत्येक बंदराव उभे असलेले भिम सैनिक आपल्या सेनापतिला महाडच्या दिशेने जाताना बघुन दुरुनच सलाम करत होती व भिम गर्जनानी आकाश धुमधुमत होता. हरेश्वर ते दासगाव प्रवासासाठी बोट बदलली. बाबासाहेब अंबा नावाच्या बोटीवर चढतात अन पुढे महाडच्या दिशेनी कुच करतात. निरोप देणार-या सैनिकांचे डोळे पानावत होते तर स्वागत करणा-यांमधे जल्लोश होता. पावन पावलांच्या स्पर्शाने समुद्रकिना-यावरिल प्रत्येक दलित उद्धारुन गेला होता. दुरुनच का होईना पण त्याना बाबासाहेबांचे प्रत्यक्ष दर्शन घडत होते. आपला नेता या मार्गाने गेला या घटनेनी आंबेडकरी जनता भारावुन गेली होती. तसं प्रत्येक घरातुन किमान एक माणुस आधिक महाडला जाऊन पोहचला होता पण ज्याना जाता आले नाही ते जागो जागी बंदरावर गर्दी करुन बाबासाहेबान सलामी देत होते.
२५ डिसेंबर १९२७ ला दुपारी १२.३० ला हे सेना दासगावला धडकली. तिथे ३५०० हजार भिम सैनिक आधिपासुनच सेनापतिची वाट पाहात होते. बाबासाहेबांचं जंगी स्वागत झालं. सत्याग्रहांचा जयजयकार गगनला जाऊन भिडतो.
बाबासाहेबांना घेण्यासाठी पोलिसांची गाडी उभी असते. आपल्या कार्यकर्त्याना पाच पाच च्या रांगा करुन शिस्तीने चालण्याची आज्ञा करुन बाबासाहेब पोलिसांच्या गाडीत बसतात व जिल्हाधिका-याला भेटण्यासाठी निघतात. बॅंड बाजाच्या वाज्या गाज्यात हे सत्याग्रही परिषदेच्या दिशेनी निघतात.
बाबासाहेब आंबेडकरकी जय, अशा घोषणा देत दासगाव ते महाड ५ मैलाचा अंतर कापत सत्याग्रही दुपारी २.३० च्या दरम्यान परिषदेच्या मंडपात पोहचतात. या मिरवणुकीचं स्वागत करण्यासाठी श्री अनंतराव चित्रे पुढे येतात. कार्यकर्त्यांचं स्वागत करताना रायगडकडे बोट दाखवितात, अंगिकृत कार्यात यश यावे म्हणुन समतेचा आदर्श घडविणा-या महाराजांच्या नावाने घोषणा चालु झाल्या. अशा समतेच्या राज्याला घडविणा-या वीर मातेच्या नावानेही घोषणा सुरु झाल्या. महाराना पाटिलकी ते किल्लेदार पर्यंत नेमणा-या त्यांच्या भुमीत आज आपल्याला पिण्याच्या पाण्यासाठी लढा उभारावा लागत आहे याचे दु:खही होत होते.
अख्या मंडपात विविध सुचना फलकं, व शुभविचाराच्या पाट्या लावण्यात आलेल्या होत्या. संपुर्ण मंडपात एकच एक फोटो लावलेला होता अन तो फोटो होता मोहनदास क. गांधी यांचा. या फोटोलावण्यामागची भुमिका काय असावी याचा अंदाज बांधणे कठिण आहे. तसं गांधी हे केंव्हाच दलितांचे नेते नव्हते ना बाबासाहेब त्याना आदर्श मानित तरी त्यांचाच एकमेव फोटो तिथे का लावला याचं गुपित उलगडत नाही.
तोवर जिल्हा आधिका-याला भेटुन बाबासाहेब थेट मंडपात आले. भोजनाची वेळ झाली होती. त्यानी स्वत:साठी वेगळे अन्न नाकारले अन समस्त सत्याग्राह्यांसाठी जे अन्न शिजविले होते तेच अन्न खाऊन पुढच्या कामाला लागले.
एकंदरीत अरिस्थीत चिघडेल की काय अशी सरकारला धाकधुक होतीच. एवढामोठा जनसमुदाय पेटुन उठल्यास आवरणे अवघड होईल याची सरकारला जाण होती. हिंदु सनातनी संघटनांचा सरकारवर दबाव होताच. सनातनीही धुसफुसत होते. एकंदरीत परिस्थीती पाहता सरकारची गोची झाली होती. काही अनर्थ होऊ नये म्हणुन तळयाच्या आस पासच्या भागात धारा १४४ लागु करण्यात आली.
पहिले दिवस: २५ डिसेंबर १९२७
सायंकाळी ४.३० वाजता अखेर परिषद सुरु झाली. स्वागताध्यक्षाने भाषण दिले व नंतर अध्यक्षिय भाषणासाठी बाबासाहेब उभे झाले. ते उभे राहताच संपुर्ण मंडपात टाळ्यांचा कडकडाट झाला, बाबासाहे ब आंबेडकरकी जय, अशा घोषणा झाल्या अन बाबासाहेबानी माईक हातात घेऊला व भाषणास सुरुवात झाली. आता मात्र सगळया मंडपात एकदम शांतता पसरली. बाबासाहेब बोलु लागले, सत्याग्रही त्यांचा एक शब्द साठवु लागले.
“सनातन्यानी अमानुषपणाचा कळस गाठला आहे. गुरा ढोराना जे पाणि मिळते त्याला स्पर्श करण्याचा आम्हाला अधिकार नाही, हि अस्पृश्यता आता आपणच धुवुन काढायची आहे. खरंतर या चवदार तळ्याचे पाणि न प्याल्याने आम्ही मरणार नाही. आज पर्यंत आमचे अडले नाही किंवा अडणारही नाही. ते पाणि पिऊन आम्हाला अमरत्व प्राप्त होईल असेही नाही. पण आम्हाला तिथे अटकाव घालण्यात येतो तो अटकाव तोडायचा आहे. आमच्या मुलभुत अधिकारावर जी गदा आली ती घालवायची व हक्क बजावायचा म्हणुन हि सगळी धडपड चालु आहे. या लोकानी आम्हाला माणुस म्हणुन स्विकारावे व तळ्याचे पाणि आम्हास खुले करावे हिच आमची मुख्य मागणी आहे. हि सभा समतेची मुहुर्तमेढ रोवण्यासाठी बोलावली आहे. आता समतेचे वारे देशाच्या काना कोप-यातुन वाहु लागले आहे. जिकडे तिकडे अस्पृश्य बांधव पेटुन उठले आहे. आम्हाला फार दिवस अटकाव करता येणार नाही. अटकावाच्या विरोधात जी शक्ती एकवटु लागली आहे त्याचा अंदाज घेताला आहे. हि शक्ती अटकावाचे सगळे बांध तोडुन सारं देशाला आपल्या प्रवाहाच्या कवेत घेऊनच थांबणार आहे. प्रवाहाचा वेग, अन भावनांचा उद्रेक असा खडबडत निघणार की सा-या सनातनी प्रथा त्या महापुरात बुडुन दम तोडतिल. महाड नगरपालिकेनी मणुष्य जातिला काळीमा फासणारा ठराव पास करुन एक अमानुष निर्णय घेतला आहे. आता याच भुमित सनातनी आत्याचार परतवुन लावण्याची शपथ घेऊया अन कुठल्याही किमती आपला मुलभुत अधिकार मिळवुनच दम घेणार असा निर्धार करु या.” अशा प्रकारे बाबासाहेबांच भाषण झालं व सगळा समाज पार न्हाऊन निघाला होता. नव्या दिशा दिसु लागल्या. आता अंधारातुन बाहेर पडण्याची आशा जागी झाली. गुलामगिरीच्या बेड्या तोडण्याच्या दिशेनी मार्गक्रमन चालु झाले. भविष्यातिल आंदोलनाच्या उग्रतेची हि नांदी होती.
त्यानंतर मणुष्य जातिला काळीमा फासणारी व असमतेचा पुरस्कार करणारी हिंदु समाजाची धर्मचोपडी मनुस्मृती, या मनुस्मृतीने आमच्या समाजाच्या कित्तेक पिढ्या भस्म केल्या होत्या. आज मनुस्मृतीला भस्म करण्याचा दिवस होता. श्री. सहस्त्रबुद्धे यानी मनुस्मृती नावाचा सनातन्यांचा ग्रंथ दहन करण्याचा ठराव मांडला. राजभोज यानी या ठरावाला आपला पाठिंबा दर्शविला. बहुमताना मनुस्मृती दहनाची ठराव संमत झाला.
मनुस्मृती दहनाचा कार्यक्रम पार पाडण्यासाठी परिषद मंडपाच्या पुढे एक खड्डा खोदण्यात आला. लोकानी मनुस्मृतीच्या काही प्रती गावातुन विकत आणल्या. कित्येकाना याची आधिच माहिती मिळाल्यामुळे प्रती सोबत आणलेल्या होत्या. शेवटी रात्री ९ वाजता मनुस्मृतीच्या प्रती खड्ड्यात टाकण्यात आल्या व एका बैराग्याच्या हाताने मनुला आग देण्यात आली. मनुस्मृतीला पेटविल्यावर जोरात घोषणा सुरु झाल्या. अख्या मंडमात जल्लोष होता. मनुचा अशा प्रकारे जाहीर दहन करुन अस्पृश्यानी आपण असले जातियवादी नियमाना भिक घालत नाही व समतेची कास धरली आहे याचा संदेश उभ्या भारताला दिला. खरं तर १९२६ मधे एक वर्षा आधी मद्रास प्रांतामधिल ब्राह्मणेत्तर नेत्यानी मनुचे जाहिर दहन केले होते. पण त्या दहनात अन या दहनात बराच फरक होता. ईथे थेट समाजाच्या सगळ्यात उपेक्षीत व मनुने ज्यांच्या अमानुष अत्याचार केला त्या वर्गाने, अस्पृश्याने थेट मनुवर परतुन वार केला होता. मनुवाद्यांसाठी हि घट्ना फार मोठी होती. हा प्रतिकार आकाशाला भोक पाडण्याच्या मनोबलाने फेकलेल्या दगडागत होता. अस्पृश्यांचा निश्चय, निर्धार व आत्मबलाचा जाहिर शक्तिप्रदर्शन करणारा व लढ्यास सज्ज असल्याची हि घोषणा होती. या घोषणेनी देशातिल सनातनी पेटुन उठले. दिसेल त्या अस्पृशाला जमेल तशा पद्धतिने ठेचण्याचे काम चालु होणार होते. पण आता मात्र अस्पृश्य नुसता प्रतिकार करणार नव्हता तर प्रतिहल्ला चढविण्याच्या वळणावर येऊन ठेपला होता. गुलामीची जाणीव झाली होती, ती झिटकारण्याची व त्या साठी दोन हात करण्याची सगळी पुर्व तय्यारी झाली होती. महाडची परिषद म्हणजे स्वातंत्र्याच्या पुर्वसंधेची घोषणा होती. आता गुलामगिरी एकदाची घालवुनच दम घेण्याचा निर्धार पक्का झाला होता. अशा प्रकारे मनुस्मृतीच्या दहन कार्याने परिषदेचा पहिला दिवस संपन्न झाला.
दुसरा दिवस: २६ डिसेंबर १९२७
आज परिषदेचा दुसरा दिवस, बाबासाहेबाना एकंदरीत परिस्थीतीची जाण होती. सनातन्यानी चवदारतळ्याचे प्रकरण न्यायालयात दाखल करुन तात्पुर्ती अडचण उभी केली होती. आता सनातनी व अस्पृश्य या मधे सरकारले पडणे अपरिहार्य होते. सरकारनी बाबासाहेबाना सत्याग्रह करु नये किंवा केल्यास सरकारला अडचण होणार नाही या पद्धतिने तो सत्यग्रह चालवावा अशी विनंती केली. जिल्हाधिका-याने स्वत: बाबासाहेबांकडे तशी विनंती केली. कुठलाही अनर्थ घडु नये म्हणुन पोलिस यंत्रणा सज्ज झाली. चवदार तळे व परिसरात १४४ धारा लागु केली. बाबासाहे हि सगळी परिस्थीती बघुन लोकांचे मनाचे वेध घेण्याचे ठरवितात.
“ प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे. न्यायालयाचा निकाल येईस्तोवर वाट बघणे व नंतर जो काय निर्णय घ्यायचा तो घेणे असा एक पर्याय आहे. किंवा सरकारची तमा न बाळगता सत्याग्रह करणे व तळे अस्पृश्यांसाठी खुले करण्यासाठी लढा उभारणे असे दोन मार्ग आपल्या समोर आहेत. आपण जर सरकारला न जुमानता नियमांचा उल्लंघन करुन सत्याग्रह केला तर सरकारचा रोष ओढवुन घ्यावा लागेल. आज या इंग्रज सरकारच्या मेहरबानीमुळे आपण किमान सनातन्यांच्या विरोधात आवाजतरी उठवु शकतो. आपल्या हक्काची मागणी करु शकतो. पण सरकारच्याच विरोधात गेल्यास कार्याची गती मंदावेल. मी स्वत: बद्दल बोलायचे झाल्यास सरकारचे नियम मोडल्यामुळे माझी वकिलीची सनद काढुन घेतली जाऊ शकेल. पण मी त्याला घाबरत नाही. माझी सत्याग्रहाची तयारी आहे. आता मला तुमचे मत आजमावायचे आहे. तुमची मनातुन तयारी आहे का? सत्याग्रह केल्यास तुरुंगात जावे लागेल हे मात्र नक्की. तुरुंगात जाण्याची तय्यारी ठेवा. तुरुंगात घातल्यावर माफी मागु नका. हाल अपेष्टा सहन करणार पण समतेचा लढा मागे घेणार नाही असा निर्धार करा. मी सांगतो म्हणुन तुरुंगात जाणारे मला नको आहेत. तर तुरुंगात जाईन पण अस्पृश्यता घलविन असे म्हणणारे मला पाहिजेत.” अशा प्रकारे भाषण देऊन बाबासाहेबानी सत्याग्रहाचा ठराव मांडला. ठरावाच्या बाजुन १२ मते पडली तर विरोधात ८ मते पडली. अस्पृश्य पुढा-यातिल काहिंचं मत असं होतं की न्यायालयाचा निकाल येईस्तोवर वाट पाहणे जास्त सोयीचं होईल.
अशा प्रकारे दुपारचं काम संपेस्तोवर पुण्यातिल ब्राह्मणेत्तर नेते जेधे-जवळकर महाडच्या परिषदेस दाखल झाले. मंडपात त्यांचं जंगी स्वागत झालं. यानीच बाबासाहेबाना ब्राह्मण लोकांचा समावेश नको अशी अट घातली होती. पण अस्पृश्य निवारण कार्यात ब्राह्मणांच्या सहकार्याची गरज तर होतीच पण माझा लढा जातीचा नसुन नितीचा आहे असे सांगुन अट अमान्य केली होती. आता मात्र जेधे-जवळकर हे विना अट परिषदेस हजर झाले होते. बाबासाहेबांच्या मनात खरी करुना होती. सुरुवातीला त्यानीही आवेशात येऊन सत्याग्रह करायचाच असा ठरावाला पाठिंबा दिला. आजुन त्याना एकंदरीत न्यायीक परिस्थीतीची जाण नव्हती. सत्याग्रह करायचे ठरले व प्रत्यक्ष कृतीत भाग घेणा-यांची नाव नोंदणी सुरु झाली. कारण तळ्याच्या परिसरात १४४ लागु असल्यामुळे तिथे गेल्यावर गोळीबार किंवा लाठिमार होणार इतके पक्के होते. त्यासाठी ख-या लढवय्यांची गरज होती. त्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे तुरुंगवास भोगायची तयारी असणे गरजेचे होते. बघता बघता सत्याग्रहाच्या प्रत्यक्ष कृतीत उतरणा-यांची यादी लांबत गेली. ४००० पेक्षा जास्त लोकानी प्रत्यक्ष कृतीसाठी आपली नावं नोंदविली. एवढा मोठा जनसमुदाय तळ्याच्या आवारात घुसुन तळ्यावर तुटुन पडण्याच्या मनसुब्यात होता. नुसतं बाबासाहेबांची एक हाक पुरे होती. पण बाबासाहेबानी एकंदरीत परिस्थीती ताळली. यात कित्येक लोकांअर लाठ्या काठ्या पडणार होत्या. त्याही पुढे जाऊन गोळीबार झालाच तर काहीना जीवास मुकावे लागणार होते. मागच्या वेळेस सनातन्यानी आपल्या बांधवांचं रक्त सांडविलं होतं, आता सरकरसुद्धा हेच करणार होते. त्यापेक्षा न्यायालयाच्या निकालाची वाट बघणे हा पर्याय योग्य वाटु लागला.
या सर्व बाबिंवर सखोल चर्चा झाली व काहिनी सत्याग्रह तहकुब करण्याचे सुचविले. यावर ठरावाच्या बाजुने असलेल्या लोकानी वाद घातला. चर्चा रंगत गेली. तिढा सुटेना. अशा प्रकारे सत्याग्राच्या बाजुने व विरोधात असणा-या लोकांची ही चर्चा दुस-या दिवशी अर्धवटच राहिली. चर्चा तहकुब करुन आता तिस-या दिवशी परत चर्चा करण्याचे जाहिर झाले.
तिकडे कार्यकर्ते मात्र तळ्याच्या आवारात तुटुन पडण्याची तयारी करीत होते. ईकडे नेते मंडळींमधे सत्याग्रह कराव की नाही हेच ठरत नव्हते.

दिसरा दिवस: २७ डिसे. १९२७
तिस-या दिवशी बाबासाहेबानी सत्याग्रह तहकुबीचा ठराव मांडला. परत भरपुर चर्चा झाली व शेवटी सत्याग्रह तहकुबीचा निर्णय घेण्यात आला. तसे जाहिर करण्यात आले. हे ऐकुन मंडपातील कार्यकर्ते नाराज झाले. मंडपात शांतता पसरली. वीरांचा हिरमोड झाला, उत्साह विरुन गेला, आवेग ओसरु लागला, अनुयायी नाराज झाले. कित्येक लोकानी हि जंग फत्ते करण्याच्या नुसत्या विचारानेच सुखावुन जात होते. अन हताश होऊन सगळे भिम सैनिक मंड्पात बसले व बाबासाहेबांचे भाषण चालु झाले.
“सत्याग्रह तहकुब केल्यानी नाराज होऊ नका. मी हा निर्णय फार विचारपुर्वक घेतला आहे. मी सरकारला घाबरत नाही. पण आजची वेळ कायद्याच्या दृष्टिने पेचात पाडणारी आहे. हा निर्णय मी तडीस नेल्या शिवाय शांत बसणार नाही. फक्तो तो दिवस आज नाही एवढेच लक्षात ठेवा. आपण जे काही करतोय ते कायद्याच्या चौकटी राहुन करतो आहे. कायदा हातात घेतल्यास व सरकारच्या विरोधात गेल्यास जे मिळायचे तेही मिळणार नाही. म्हणुन आपला लढा आडमुठेपणाचा नसाव तर कायदेशीर मार्गाचा असावा. याच कारणास्तव आपण हा सत्याग्रह तहकुब केला आहे.” अशा प्रकारे बाबासाहेबानी अनुयायांची समजुत काढली व हा लढा पुढे पद्धतशीरपणे व कायदयाच्या चौकटीत राहुन लढण्याचे जाहीर केले.
ठरल्या प्रमाणे अनुयायांची मिरवणुक निघाली, शांततेत तळ्याला वळसा घालुन मिरवणुक सभा मंडपात आली व विसर्जित झाली. भिमसैनीक आपापल्या गावाच्या दिशेनी निघाले.
याच दिवशी रात्री चांभारवाड्यात सभा घेतली. चांभारानी दाखविलेली उदासिनता, व निष्क्रियता त्याना एक दिवस भोवणार व त्यांची गुलामगिरीतुन केंव्हाच मुक्तता होणार नाही. तेंव्हा समस्त चांभार बांधवानी आता या अस्पृश्यांच्या लढाईत सक्रिय भाग घ्यावा अन आपल्यावरील कलंक धुवुन काढावे असे आवाहन केले.
त्यानंतर बाबासाहेब बुद्ध लेनी बघायला गेले व महाडवरुन आपला मोर्चा रायगडाकडे वळविला. बाबासाहेब आपल्या कार्यकर्त्यांसकट रायगडावर मुक्कामी गेले. रायगडावर मुक्काम करुन नंतर मुंबईस रवाना झाले.
रायगडावर मुक्कामी गेल्यावर भिमसैनिकांच्या कानावर एक बातमी आली की सनातन्यानी रायगडावर जाऊन बाबासाहेबांचा बंदोबस्त करण्याचे ठरविले आहे. बातमी वा-यासारखी पसरली. तिकडे गडावर अस्पृश्यांचा राजा या बातमिने अनभिज्ञ होता. पण ते भिम सैनीक होते, बाबासाहेबांवर जीव ओवाळुन टाकणारे कार्यकर्ते गावो गावी जमले व गडाला वेढा दिला. कित्येक शतकानंतर आज रायगडाला वेढा पडला होता. पण त्या अन आजच्या वेढ्यात बराच फरक होता. आज याच मातितील आपल्याच समाजातील शत्रुपासुन अस्पृश्यांच्या राज्याच्या जीवाचे रक्षण करण्यासाठी महार मावळे गडाकडे धावले व रात्रभर जागत खडा पहारा दिला. खालुन भिमसैनिक ओरडुन ओडुन रात्रभर वरिल आपल्या सेनापतिला संदेश देत होते. जीवाला जपा, धोका आहे. असा आवाज देत होते. बाबासाहेबाना मात्र या वाक्याचा अर्थ लागेना.गडाखालुन आवाज देणारे नेमके कोण? शत्रु की अनुयायी हेच कळेना.
शेवटी रात्र गुजरली व सकाळी त्याना कळले की आपल्या रक्षणार्थ भिमसैनिकानी रात्रभर उभ्या गडावर पहारा दिला होता.

0 comments:

Post a Comment

:) :)) ;(( :-) =)) ;( ;-( :d :-d @-) :p :o :>) (o) [-( :-? (p) :-s (m) 8-) :-t :-b b-( :-# =p~ $-) (b) (f) x-) (k) (h) (c) cheer
Click to see the code!
To insert emoticon you must added at least one space before the code.