About

Searching...
Thursday, 5 July 2012

डॉ. बाबासाहेब आंबेडकर - भाग : १३ (महाड सत्याग्रह)

July 05, 2012

डॉ. बाबासाहेब आंबेडकर - भाग : १३ (महाड सत्याग्रह)
१९२७ उजडला, मागिल वर्षी जे अस्पृश्यता निवारनाचे वारे देशभर वाहु लागले होते त्याचं आता वादळात रुपांतर होण्यास सुरुवात झाली होती. जे संवर्ण या काळात गाफिल होते त्यांची झोप उडविणाच्या दिशेनी वाटचालु सुरु होती. आता मनुच्या भिंतीना हादरे देणा-या अस्पृश्यांच्या सभाना उधान आले होते. जिकडे तिकडे एकच नाव, बाबासाहेब आंबेडकर. अन अशातच नविन वर्षाची सुरुवात पुणे जिल्ह्यातील कोरेगाव भिमा येथील महारांच्या विजयस्तंभाला सलामी करुन, अस्पृश्यांची एक मोठी सभा घेऊन करण्यात आली होती. या सभेत बाबासाहेबानी इंग्रजांवर ताशेरे ओढले होते. ज्या ब्रिटिशाना पेशव्यांच्या विरोधात लढाईत विजयी मिळवुन देण्यासाठी महार सैन्यानी रक्त सांडले होते त्या महाराना लष्करभर्ती बंदी घातल्याचा निषेध नोंदविण्यात आला. ब्रिटीशानी लगेच लषकरभर्ती बंदी उठविली नाही तर सत्याग्रह करण्याचा संकेतही देऊन टाकला.

बाबासाहेबांचा प्रभाव भारतिय राजकारनात वाढु लागला. संपुर्ण अस्पृश्य समाज बाबासाहेबांच्या पाठीशी उभा होता. लोकं त्यांच्या सांगण्यावरुन शेकडो मैलचा प्रवास करुन सभाना हजेरी लावत होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली चळवळ प्रचंड वेगाने पसरत होती. एकंदरीत त्यांचा वाढता प्रभाव बघुन ब्रिटिश सरकारनी बाबासाहेबांची विधिमंडळात सदस्य म्हणुन नेमणुक केली. या निमित्ताने फेब्रुवारी १९२७ ला अस्पृश्य समाजातील शिक्षकानी त्यांचा सत्कार करण्यासाठी मुंबईत एक सभा भरविली अन बाबासाहेबांचा सत्कार करण्यात आला. आता असे अनेक सत्कार समारंभ होऊ लागले. जिकडे तिकडे आंबेडकर नाव दुमदुमु लागले. याच सभेत कार्यकर्त्यानी बाबासाहेबाना पैशाची थैली अर्पण केली होती, अन ती थैली बाबासाहेबानी तशीच बहिष्कृत हितकारिनी सभेला अर्पण केली.
आता अस्पृश्यांचा आत्मसन्मान हळू हळून जागा होऊ लागला होता. लोकं रस्त्यानी चालताना मान वर करुन चालु लागली. या भुमित हजारो वर्षानी हे पहिल्यांदाच घडत होतं. संवर्णांपेक्षा आपण कणभरही कमी नाही याची काही लोकाना जाणिव झाली अन ते जागृतीचं काम करत फिरु लागले. प्रत्येकाला आता गुलामगिरीची जाणीव होऊ लागली. आता सगळा समाज गुलामगिरी झटकुन टाकायच्या तयारीला लागला होता. स्वत:च्या कार्यक्षमतेचा साक्षात्कार होऊ लागला. आता बंड करण्याची वृत्ती गुलामगिरीची जागा घेऊ लागली. या व्यवस्थेचा तिटकारा वाटु लागला.
याच दरम्यान महाड नगरपालिकेनी सिताराम केशव बोले यानी विधिमंडळात पास करुन घेतलेल्या ठरावाची अमलबजावनी करण्याचा निर्णय जाहीर केला. या निर्णया प्रमाणे महाड नगरपालिका आपल्या अधिकारातील चवदार तळे हे अस्पृश्यांसाठी खुले करण्यात आल्याची जाहीर घोषणा केली. हि घोषणा होताच अस्पृश्यांचा वस्तीत जल्लोष झाला. आता चवदार तळ्याचे पाणी चाखता येईला या आनंदाने लोकांनी जणु उत्सव साजरा केला. कायद्याने बहाल केलेला अधिकार बजाविण्यासाठी महार वाड्यातुन बायका पोरी मडकी, हंडे घेऊन तळ्यावर पोहचली. पण मनुचे प्रतिनिधी फार कर्मठ. त्यानी महाराना तळ्यावरील पाणी घेण्यास मज्जाव केला. बिचा-या पिडित अस्पृश्यांमधे एवढा दम कुठे होता की ठणकावुन आपले हक्क बजावतील. संवर्णांची शिवीगाळ खाऊन मान खाली घालुन घराच्या वाटेनी पाणि न घेताच परतले. सगळा गाव खदखदत होता. ईकडे अस्पृश्य हक्क न मिळाल्यामुळे तर तिकडे संवर्ण अस्पृश्य माजलेत म्हणुन धुसफुसत होता. आग दोन्हिकडे लागली होती. एक अधिकारासाठी तर दुसरी मनुवादी वर्चस्व टिकविण्यासाठी. अन हा हा म्हणता हि बातमी बाबासाहेबांच्या कानावर पडली. बाबासाहेब अत्यंत विशिण्ण मनस्थीतीने सगळा प्रकार ऐकला. मन विदिर्ण झाले. हा संवर्णांचा घोर अपराध होता. ज्या तळ्यातिल पाणी गुरा ढोरांसाठी उघडे होते, मुसलमान व ख्रीश्चनांसाठी उघडे होते. प्राण्या पक्ष्यांसाठी उघडे होते पण आपल्याच समाजातील अस्पृश्य बांधवाना तिथे अटकाव घालण्यात आला यामुळे बाबासाहेब फार संतापले. आज कायद्यानी तो अधिकार दिल्यावर मनुवाद्यानी अटकाव करण्याचे काहीच कारण नसताना सुद्धा मनुवाद्याने हे प्रताप केले होते. या सगळ्या प्रकाराणे बाबासाहेबानी एक अत्यंत महत्वाचा निर्णय जाहीर केला. चवदार तळ्याचे पाणि चाखने हा अस्पृश्याना कायद्याने दिलेला अधिकार आहे व तो आपण कुठल्याही किमतीत बजावायचाच. आपण १९ व २० मार्च १९२७ ला महाडला चवदार तळ्याचे पाणी चाखण्यासाठी सत्यग्रह करणार, मी स्वत: तिथे जातीने हजर राहुन आपला अधिकार बजाविणार अशी भीम गर्जना केली.
या भीम गर्जनेची डरकाळी देशभर गेली. लाखो लोकांच्या अंगात विज चमकुन गेली. कार्यकर्त्यांचा उत्साह द्विगुनीत झाला. जिकडे तिकडे लोकानी या चळवळीत भाग घेण्यासाठी तय्यारी चालविली. सुरभा टिपणीस, सुभेदार सवादकर, संभाजी गायकवाड, शिवराम जाधव, अनंतराव चित्रे, रामचंद्र मोरे या अस्पृश्य पुढा-यानी आपली सगळी ताकत एकवटुन गावो गावी प्रचार चालविला. लोकाना दोन दिवस महाड सत्याग्रहास हजेरी लावण्याचे सांगण्यात येऊ लागली. जनता बाबासाहेबांच्या या निर्णयाने आनंदाने न्हाऊन निघाली. आज आपल्या महान नेत्याच्या सहाय्याने या पहिल्या वहिल्या जाहिर लढाईत भाग घेण्याची संधी कोणीच गमविणार नव्हता. बघता बघता १९ मार्च हा दिवस जवळ येऊ लागला. ही दरिद्र्यांची सभा होती. येणारी लोकं हजारो वर्षाच्या काळोखात जिवन व्यथीत करुन स्वाभिमान हरविलेली व अंधकाराचे कित्येक थर बुद्धीवर साचलेले अन गुलामिचं जिवन जगणारी अस्पृश्य होती. येण्यासाठी हातात पैसे नव्हते म्हणुन एक आठवडा आधिच पायी निघालेली कित्येक लोक हळू हळू महाडला उतरत होती. बघता बघता १९ मार्च उजाडला अन हजारोच्या संखेनी पाठीवर भाकरीची शिदोरी बांधुन अस्पृश्यानी महाडला हजेरी लावली होती.
चवदार तळ्यापासुन दोन फर्लांग अंतरावर एक विराट असे मंडप उभारण्यात आले होते. येथेच आमच्या अस्पृश्य बांधवांचा मुक्काम होता अन परिषदही ईथेच भरणार होती. गावातील संवर्णांमधे धुसफुस सुरु होती. अस्पृश्यांच्या अफाट लोकसमुदायाच्या लाटा बघुन त्यांचे धाबे दणाणले होते. पण ही चळवळ फसावी म्हणुन तिथल्या संवर्णानी असहकार करायचे ठरविले. ईतक्या लोकाना पिण्याच्या पाण्याची कमतरता जाणवु लागली. ईतर वेळी मंदीरांच्या पुजेत किंवा इतर समाज कार्यात सढळ हातानी दाण करुन पुण्य कमविणारे संवर्ण आपल्याच बांधवांना मात्र पैशानीही पाणि देण्यास तयार नव्हते. शेवटी बरीच खटपट करुन ४० रुपये खर्ची घालुन पाणी घेण्यात आले. आलेल्यांची पाण्याची गरज भागली अन या सत्याग्रहाचा पहिला दिवस सुरु झाला. १९ मार्च १९२७ ला महाड सत्याग्रहाची सभा या तंबुत सुरु झाली.
श्री. संभाजी गायकवाड हे स्वागताध्यक्ष होते. त्यांच्या भाषणाने परिषदेची सुरुवात झाली. पुढे बसलेली जनता ही फाटक्या कपड्याची, दारिद्र्यानी पछाडलेली व आत्मसन्मान गमावलेली होती. पण आज या परिषदेत हजेरी लावुन हे सगळ झिटाकरण्याची तयारी असल्याचा व माणुस म्हणुन जगण्याचा निर्धार केल्याचा पुरावा देत होती. अशा या गरिब व शोषित बांधवांच्या सभेत सुरुवातीची काही भाषणं झाल्यावर बाबासाहेब भाषणास उभे राहतात. पांढरा शुभ्र बंगाली धोतर, सदरा व कोट असा त्यांचा पेहराव होता. बाबासाहेब उभं राहताच टाळ्यांच्या कडकडाटाने अख्खं मंडप दुमदुमलं. बाबासाहेबानी आपले भाषण चालु केले.
“आम्ही सरकारला नेहमी अनुकुल असतो म्हणुन आमची उपेक्षा होते. आपण नेहमी झुकतं माप घेतल्यामुळे आमचा कोणी विचारच करित नाहीत. महाराना लष्करभर्ती बंदी याचाच एक नमुना आहे. आपल्यावरील हि बंदी जरी ईथल्या संवर्णांच्या सांगण्यावरुन लादली असली तरी इंग्रजानी असं डोकं गहान ठेवण्याचं मुख्य कारण ते नाही, तर आम्हीच आहोत. आपण आपल्या अधिकारासाठी केंव्हाच ठणकावुन उभे रहात नाही म्हणुन आपल्यवर आज हि वेळ आली. सरकार जरी इंग्रजांच असलं तरी अधिकारी वर्ग मुख्य भुमिका बजावत असतो. तुम्ही आता शिक्षणाची कास धरा. सरकार दरबारी उच्च पदस्थ अधिकारी म्हणुन जा. अन आपल्या अधिकारांची अमलबजावणी करा. या महाडमधेच बघा ना, आज नगरपालिकेनी हे तळे आपल्यासाठी जरी खुले केले तरी आज आपल्याला ईथे अटकाव होतो. तेच जर आपले अधिकारी येथे वरिष्ठस्थानी बसलेले असते तर हि वेळ आलीच नसती. म्हणुन आपला माणुस सरकार दरबारी वरिष्ठ पदावर असणे गरजेचे आहे. ४ थी शिकलेल्या ४० जणांपेक्षा बी. ए. झालेला एक माणुस मला जास्त महत्वाचा वाट्तो. म्हणुन सगळ्यानी जास्तित जास्त शिक्षण घेण्याचा निर्धार करावा. मृत जनावरांचे मांस खाणे आता सोडुन दया. महाराना गावात इज्जत नाही कारण आपल्यात स्वाभिमान नाही. स्वाभिमानाने जगायला शिका अन पोरा बाळाना शाळेत धाडा. महारानी आता वतनाचा लोभ सोडुन दयावा अन शेतीकडे वळावे. जंगलातील शेती मिळवावी अन स्वत: पिकविणारा अन्नदाता बनावे.” अशा प्रकारचं महारांमधे नवचैतन्य भरणारं एक जबरदस्त भाषण देऊन आजची सभा संपली.
त्या रात्री बाबासाहेब व इतर कार्यकर्ते टिपणीसांच्या घरी बसुन दुस-या दिवशीच्या कार्यक्रमाची रुपरेषा ठरवित होते. दुस-या दिवशी गावातील काही पुढारी जे स्वत:ला पुरोगामी समजतात ते परिषदेस हजेरी लावणार होते. या पुढा-यांच्या मदतीने ऐन वेळेवर तळ्याचे पाणी चाखण्याचा प्रस्ताव पुढे करुन तळ्यातिल पाणी पिण्याचं ठरलं. महाड नगरपालिकेच्या ठरावाला प्रत्यक्ष कृतीत उतरविण्याचा एकंदरीत आराखडा तयार झाला.
दुस-या दिवशी परिषद सुरु झाली. गावातिल पुरोगामी पुढारीही ठरल्या प्रमाणे आलेत. त्याना मोठया तो-यात भाषणही ठोकही. आम्ही कसे सुधारनेला पांठिंबा देत आहोत हे त्यानी आपल्या भाषणात ठणकावुन सांगितले. पण काहि तासातच त्याना प्रत्यक्ष कृतीतुन हे सिद्ध करण्याचं आव्हागन पुढे उभं ठाकेल याचा अंदाज नव्हता. आपला भोपळा ईथेच फुटणार याची जाणिव नसल्यामुळे वाट्टेल ते ठोकम ठाक चालु होतं. दुपार पर्यंत सगळ्यांची भाषणे संपली अन त्या अनुषंगाने आजुन नविन ४ ठराव या परिषदेत पास करुन घेण्यात आलेत. अन आता परिषदेचे कामकाज संपणार अशी घोषणा होत असतानाच ठरल्या प्रमाणे व पुर्व संकेतानी अनंतरव चित्रे ताडकन उठुन “आपण महाड नगरपालिकेचा ठराव अमलात आणु या” अशी गुगली टाकली. हे वाक्य ऐकुन परिषदेस कोसो दुरचा पायी अंतर कापुन आलेला प्रत्येक अस्पृश्य सुखावला अन टाळ्यांचा कडकडाट झाला.

स्पृश्य नेत्यांचे मात्र धाबे दणाणले. त्यानी या प्रत्यक्ष कृतीस नकार दिला. या मुळे संवर्णाचा रोष ओढवुन घेण्याची त्यांची तयारी नव्हती. लोकांच्या मताच्या विरोधात जाऊन काहिही करण्याची त्यांची तयारी नव्हती. महारानी तळ्याला हात लावल्यास संवर्ण उठाव करतील याचा त्याना अंदाज होता. त्यानी वेळ साधुन मागच्या दारातुन पळ काढला व आता काही वेळापुर्वी भाषणातुन अस्पृश्य निवारणाच्या ज्या बढाया मारल्या त्या उघड पडल्या.
ठरल्या प्रमाणे वरील सगळी मंडळी बाबासाहेबांसोबत तळ्याच्या दिशेन कुच करतात. त्यांच्या मागुन अस्पृश्य समाजाचा जनसमुदायही तळ्याच्या काठावर येतो. बाबासाहेब पुढे होऊन तळयातिल पाणि ओंजळीत धरतात. तेंव्हा ते ओंजळीतले पाणि पाहुन त्यांचे डोळे पानावले. हे पाणि, जे सगळ्या प्राणिमात्रांना, कुत्र्या मांजराना व गुरा ढोराना उघड आहे पण मला व माझ्या बांधवाना याचा स्पर्श एवढे वर्ष वर्ज होता. मात्र मी याला नुसता स्पर्श करणार नाही तर हे प्राशन करतो म्हणुन त्यानी ओंजळीतले पाणि प्राशन केले. अन आपल्या समस्त बांधवांसाठी हे तळे आजपासुन खुले आहे, तो आपला अधिकार आहे सगळ्यानी पाणि प्यावा असे जाहिर करताच लोकानी हजारो वर्षाची गुलामगिरी मोडीत काढली अन आज चवदार तळ्याचे पाणि चाखले. आज २० मार्च १९२७ हा खरा खुरा सोन्याचा दिवस होता.
तळ्याती पाणि पिल्यावर परिषद संपल्याची व यशस्वी झाल्याची घोषण होते अन सगळे अस्पृश्य आपापल्या गावाच्या दिशेने निघतात. बाबा साहेब दोन दिवसापासुन सरकारी डॉक हाऊस मधे मुक्कामी होते. बरीच लोकं मिळेल त्या वाहनानी गावाकडे निघाले. कित्येक लोकंतर पायी निघाले पण ज्यांचा दुरचा प्रवास होता किंवा सायंकाळी वगैरे गाडी धरायची होती अशी लोकं आजुन त्या तंबुतच होती.
हाहा म्हणता महारानी तळे बाटविल्याची बातमी गावात विस्तवासारखी पसरली. महार नुसतं तळे बाटवुन शांत बसणार नाहीत तर ते आता गावातील वीरेश्वर मंदीरातही प्रवेश करणार अशी अफवा पसरविण्यात आली. चहुकडे धर्मावर घाला घातल्याची वार्ता पसरत होती. आंबेडकरानी धर्मावर घाला घातल्याच्या बातमिने सगळा संवर्ण समाज पेटुन उठला. लाठ्या काठ्या घेऊन हिंदु लोकं तळ्याकाठच्या मंडपात धडकले. आता मंडपात फारशी लोकं नव्हतीच. होते ते निघुन गेले. उरले सुरले लोकं गावत गेले होते. बायका व मुलं फक्त मंडपात होती व जोडीला काही पुरुष मंडली होती. मारापिटी करण्याच्या जय्यत तयारिने आलेल्या संवर्णानी येथील सगळ्याना बेदम मारहाण केली. चवदार तळे बाटविण्याचा राग काढण्यात आला. बायका मुलाना पळवुन पळवुन मारण्यात आले. तिथे उपस्थीत पुरुषांची डोकी फुटोस्त्वर मारण्यात आले. सभा मंडपात जिकडे तिकडे अस्पृश्यलोकांची दाणादाण उडविण्यात आली. शिजत असलेल्या अन्नात वाळु मिसळण्यात आली. तळ्याच्या शेजारी रक्ताचा लोट वाहु लागला. चवदार तळ्याचे पाण्य आता महारांच्या रक्ताने लाल होऊ लागले. कित्येक लोकानी मुसलमान बांधवांच्या घरात शिरुन त्यांची मदत घेतली व आपला जीव वाचविला. अशा प्रकारे अमानुष मारहाण करुन संर्वर्णानी पळ काढला.
तिकडे बाबासाहेब डॉक बंगल्यात या सगळ्या घटनेपासुन अनभिज्ञ, परिषद सफल झाल्याच्या आनंदात होते. पण काही क्षणातच ईथे घडलेला सगळा प्रकार बाबासाहेबाना कळविण्यात आला. बाबासाहेबानी कार्यकर्यांसकट थेट सभा मंडपात धाव घेतली. बघतात काय तर, जिकडे तिकडे घायाळ अवस्थेत पडलेले आपले बांधव दु:खानी किंचाळत होते. हे सगळं दृश्य पाहुन बाबासाहेब अत्यंत संतापले. पण हि वेळ रागावण्यात घाविण्याची नव्हती. जखमिना दवाखान्यात नेण्यात आले. बाबासाहेबानी स्वत: २० घायाळाना दवाखान्यात दाखल करण्यात आले. तिथेही संवर्णच होते. हे संवर्ण डॉक्टर त्यांच्य पेशाला न शोभणारे शेरे मारत होते. पाणी हवे होते, घ्या आता इंजेक्शन. खुप माजलात तुम्ही त्या आंबेडकरांमुळे असले हिणकस शेरे मारत उपचार केला.
बाबासाहेबाना आज सायंकाळ पर्यंत डॉक बंगला खाली करुन दयायचा होता. त्यातच ही हाणामारी व अनेक जण जखमी झाल्यामुळे त्यानी आजुन दोन दिवस ईथेच थांबुन आपल्या बांधवांची काळजी घेण्याचे ठरविले. सायंकाळी मामलेदर व पोलिस अधिकारी डॉक बंगल्यावर बाबासाहेबांची भेट घेतली. झालेल्या प्रकरणा बद्दल दिलगिरी व्यक्त केली. तेंव्हाचे बाबासाहेबांचे वाक्य आहेत, “ तुम्ही इतराना आवरा, मी माझी माणसे आवरतो.”
ईकडे डॉक बंगल्यावर लोकांची गर्दी वाढु लागली. हजारोनी गावाच्या दिशेनी जाणारी पाऊले महाडच्या दिशेनी परत फिरली होती. महारांनी आज उभ्या महाडला मनगटातील पाणि पाजण्याचा निर्धार केला होता. अख्या संवर्णाना महाराच्या बाहुंचा बळ काय असतो ते दाखविण्याची तयारी होऊ लागली. पण बाबासाहेब फार संयमी. खरंतर बाबासाहेब फार तापट होते हे सर्वमान्य आहे पण या प्रसंगातुन ते किती संयमी होते हे सिद्ध होते. त्यानी सगळ्या कार्यर्त्याना संयमाने घेण्याचे सांगितले. तेंव्हा कार्यकर्ते त्यांच्या या निर्णयावर नाराजी व्यक्त करतात. आज आपण संखेने अधिक आहोत व काहि मिनटात संवर्णानी पाणि पाजण्याची तय्यारी आहे तेंव्हा तुम्ही तशी परवानगी का नाकाराता? असे काही कार्यकर्यानी विचारले तेंव्हा बाबासाहेबांमधिल दुर्दर्शी व संयमी पुरुष बोलतो.
तुम्ही नुसतं महाडवर तुटुन पडण्याचं बोलताय, मी उभ्या भारतावर तुटुन पडण्याचा कार्यक्रम आखलाय. तुम्ही त्या परिने तयारीला लागा. राहिला प्रश्न ईथल्या हल्लेखोरांचा. त्याना आपण कायद्यानी धडा शिकवु या.

या नंतर लोकं शांत होतात अन एकदाचं मोठं संकट टळतं.

आता कार्यकर्त्यानी परत एकदा महाड सोडण्यास सुरुवात केली. पण बाबासाहेब मात्र जखमिना सोडुन जात नाहीत. त्यांची डॉक बंगल्याची मुदत संपल्यामुळे ते टिपणिसांकडे मुक्काम हलवितात अन २३ मार्च १९२७ ला मुंबईस परत येतात.

हल्लेखोरांवर केस टाकण्यात येते अन ८ जातियवादी गुंडावर आरोप सिध्द होतो. ६ जुन १९२७ ला न्यायालयाचा निकाल येतो, अन त्या प्रमाणे वरिल सर्व आरोपिना प्रत्येकी ४ महिन्यां कारावास अशी शिक्षा ठोठावण्यात येते. आज परत एकदा अस्पृश्यांच्या वस्तित जल्लोष होतो.

0 comments:

Post a Comment

:) :)) ;(( :-) =)) ;( ;-( :d :-d @-) :p :o :>) (o) [-( :-? (p) :-s (m) 8-) :-t :-b b-( :-# =p~ $-) (b) (f) x-) (k) (h) (c) cheer
Click to see the code!
To insert emoticon you must added at least one space before the code.